पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे साधणार थेट संवाद
शेगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्द अबाधित राहावे यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये विविध धर्मीय समाजाचे मान्यवर, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, राजकीय पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सव हा लोकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग असतो. अशा वेळी कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी नागरिक आणि प्रशासन यांचा परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.
बैठकीत मिरवणुकीचे मार्ग, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था यांसंबंधी महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार आहेत. तसेच पोलीस अधीक्षक नागरिकांना संयम, शांतता आणि सामाजिक बंधुत्व जपण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून ही संपूर्ण बैठक थेट (LIVE) प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनाही प्रशासनाच्या तयारीची माहिती मिळून त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. गणेशोत्सवाच्या काळात शेगावसह संपूर्ण जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क असून शांततापूर्ण आणि आनंदी वातावरणात सण साजरा व्हावा यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.












