शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) – केंद्रातील भाजपप्रणीत महायुती सरकारने नुकताच संमत केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि लोकशाही मूल्यांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करत आज दिनांक २३ जुलै रोजी शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.
“जनसुरक्षा कायदा रद्द करा”, “तानाशाही नहीं चलेगी”, अशा घोषणा देत त्यांनी कायद्याचा आणि महायुती सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. या वेळी काँग्रेसच्यावतीने एक निवेदन तहसीलदार यांना सादर करून जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसने या कायद्याला जनतेवर लादलेला अन्यायकारक आणि अनधिकृत निर्बंध ठरवत नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा कायदा असल्याचे मत व्यक्त केले.
या आंदोलनात खामगाव मतदारसंघाचे काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले, ज्येष्ठ नेते दयाराम वानखडे, शेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास देशमुख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे, तसेच शैलेंद्र दादा पाटील आणि इतर अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसने या कायद्याला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करत, जर हा कायदा मागे घेण्यात आला नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
