
वर्धा (युवा क्रांती वृत्तसेवा) : खामगाव जिल्ह्यातील मागील तीन महिन्यांत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून आलेल्या विविध कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा संक्षिप्त अहवाल भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी वर्धा येथे आयोजित विदर्भ कार्यकर्ते मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला. अहवालातील उल्लेखनीय कामगिरी पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांच्या कार्याचे खुल्या मनाने कौतुक केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नियोजन बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत “स्थानिक संस्था म्हणजे केवळ निवडणुकीसाठी नाही, तर लोकसहभागातून विकास घडवणाऱ्या महत्वाच्या यंत्रणा आहेत,” असे ठामपणे सांगितले.
“घरोघरी विकास, मनामनात विश्वास” या मंत्राने प्रेरित होत कार्यकर्त्यांनी अधिक संघटितपणे, नियोजनबद्ध आणि जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. संघटनात्मक बळकटी, प्रभावी जनसंपर्क आणि स्थानिक विकास कामांवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या मेळाव्यात पक्षविषयक आणि प्रशासकीय बाबींवर सखोल चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे आणि विजयासाठी कंबर कसावी, असा निर्धार या नियोजन मेळाव्यात व्यक्त झाला.या नियोजन मेळाव्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार कल्याण मंत्री अॅड आकाश फुंडकर,आदिवासी विकास विभाग मंत्री अशोक उईके , राज्यमंत्री पंकज भोयर, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डाॅ संजय कुटे, आमदार हरीश पिंपळे,आमदार चैनसुख संचेती यांच्यासह आमदार, माजी आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.