
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सोयीसाठी आणि समाधानकारक प्रवास अनुभवासाठी “रेल मदत ॲप” आणि एकत्रित हेल्पलाइन क्रमांक 139 यांच्यामार्फत एक विश्वासार्ह आणि सुलभ सहाय्य प्रणाली उभारली आहे. प्रवाशांना कोणत्याही समस्येसाठी, चौकशीसाठी किंवा मदतीसाठी वेगवेगळ्या क्रमांकांवर फोन करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने सर्व आपत्कालीन आणि सामान्य सहाय्य क्रमांक एकत्र करून हेल्पलाइन 139 सुरू केली आहे, जी 24×7 सेवा देते.
रेल मदत ॲप: भारतीय रेल्वेने विकसित केलेला “रेल मदत” हा एक वापरकर्ता अनुकूल मोबाईल ॲप असून तो प्रवाशांना खालील सेवा प्रदान करतो:
• सुरक्षा सहाय्य: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ तक्रार नोंदवता येते, जी संबंधित विभागाकडे त्वरीत पाठवली जाते. • तक्रार व निराकरण: ट्रेन, स्टेशन, स्वच्छता, खाद्यपदार्थ, तिकिट यांसारख्या बाबतीत तक्रारी नोंदवून समाधान मिळवता येते.
• माहिती व चौकशी: ट्रेनची लाईव्ह स्थिती, पीएनआर स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक, स्टेशन सुविधा, परतावा माहिती इत्यादी सहज मिळवता येते.
• निगराणी व फीडबॅक: प्रवासी त्यांच्या तक्रारींची प्रगती पाहू शकतात आणि सेवा गुणवत्तेबाबत अभिप्राय देऊ शकतात.
“रेल मदत” ॲप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध असून, कोणत्याही स्मार्टफोनवर सहज डाउनलोड करता येतो.

हेल्पलाइन क्रमांक 139: एकच क्रमांक, अनेक सेवा
भारतीय रेल्वेचा एकत्रित हेल्पलाइन क्रमांक 139 हा एक ऑल-इन-वन क्रमांक आहे, जो प्रवाशांना पुढील सेवा प्रदान करतो: प्रवासाशी संबंधित सर्वसाधारण चौकशी (ट्रेन वेळा, पीएनआर, तिकिट स्थिती इ.),वैद्यकीय मदत, महिला प्रवाशांसाठी सुरक्षा, चोरी, हरवलेले सामान किंवा छेडछाड याबाबत तक्रार, खाद्यपदार्थ व स्वच्छतेशी संबंधित तक्रारी, जेष्ठ नागरिकांसाठी सहाय्य. हा क्रमांक कॉल, एसएमएस तसेच इंटरअॅक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) च्या माध्यमातून उपलब्ध आहे. भारतातील कुठल्याही भागातून, कोणत्याही वेळी संपर्क साधता येतो.
भारतीय रेल्वेचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा प्रदान करणे हा आहे. “रेल मदत ॲप” व हेल्पलाइन 139 या सेवा भारतीय रेल्वेच्या डिजिटायझेशन व प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि आपला प्रवास अधिक सुखद व सोयीचा करावा.