पक्षनिष्ठेच्या कार्याची मिळाली पावती
राहुल गांधींचेही लाभले कौतुक..!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी रामविजय बुरूंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण संघटनात्मक काम व जनतेशी असलेला संपर्क या गुणांच्या आधारे त्यांची ही निवड करण्यात आली असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रामविजय बुरूंगले यांची काँग्रेस कार्यकर्ते म्हणून वाटचाल शेगाव शहर काँग्रेस आणि सेवादलापासून सुरू झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली होती.
या कार्यकाळात त्यांनी पक्षाच्या धोरणांचे प्रभावीपणे प्रसार व अंमलबजावणी केली, त्यामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी पक्ष संघटनेत केलेल्या कामगिरीचे थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कौतुक केले होते. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व तळमळीच्या कामामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
नुकत्याच काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले असून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या नेतृत्वात रामविजय बुरूंगले यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ही त्यांच्या पक्षनिष्ठ कार्याची पावती मानली जात आहे.
युवा क्रांती न्यूजशी बोलताना रामविजय बुरूंगले म्हणाले की, “माझ्यावर पक्षश्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास मी जनतेशी नाळ जुळवत आणि काँग्रेसला घरोघरी पोहोचवत सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसला आगामी काळात राज्यभर नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास वाटतो.”
राजकीय वर्तुळात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून आगामी काळात बुरूंगले यांच्या नेतृत्वात काँग्रेसची संघटना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.