
शेगाव (प्रतिनिधी) – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शेगाव येथे भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे दर्शन घेतले.
सोहळ्यादरम्यान संस्थानच्या वतीने उपस्थित नागरिकांना विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा’ या दिव्य शिकवणीच्या माध्यमातून समाजासाठी विधायक कार्य करण्याचा संदेश दिला गेला. स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणारे मानवकल्याणासाठीचे विविध सामाजिक उपक्रम हे समाजासाठी आदर्शवत असल्याचे मत मंत्री फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, गरजूंसाठी मदत, तसेच धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रम हे देशभरात राबविले जात असून, त्याचा लाभ लाखो नागरिकांना होत आहे. शेगावमधील या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि स्थानिक आयोजकांनी परिश्रम घेतले.