
संग्रामपूर (आकाश बोरसे) : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संग्रामपूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल मोर्चा काढून लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या भाजपा धार्जिन्या धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. हा मोर्चा काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात उचललेल्या पावलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मशाल मोर्चाला तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चाची सुरुवात संग्रामपूर शहराच्या मुख्य रस्त्यांपासून झाली. दरम्यान, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. “लोकशाही वाचवा”, “निवडणूक आयोग निष्पक्ष करा”, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. मोर्चाचा समारोप बस स्टॉप परिसरात करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या मशाल मोर्चात उपस्थित मान्यवरांमध्ये पुढील नेत्यांचा समावेश होता: तेजराव मारोडे, प्रकाश देशमुख, मनोहर बोराखडे, संतोष राजनकार, संजय ढगे, सतीश टाकळकर, राजेंद्र वानखडे, शे. राज़ीक, दादाराव वर्गे, असीफ भाई, शाम डाबरे, अमोल घोडेस्वार, गजानन ढगे, प्रकाश साबे, अर्जुन घोलप, अभय मारोडे, श्रीकृष्ण दातार, अफसर कुरेशी, गणेश मानखैर, प्रशांत गावंडे, बाळासाहेब डोसे, योगेश बाजोड, अजय अग्रवाल, कडु भोलनकार, शंकरनाथ विश्वकर्मा, राजेश परमाळे, रामकृष्ण भोपळे, पंकज तायडे, प्रशांत गिरी, दीपक गव्हांदे, सचिन पालकर, विशाल लोणकर, स्वप्नील देशमुख यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या माध्यमातून काँग्रेसने लोकशाहीच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला असून, निवडणूक आयोगाने आपली भूमिका निष्पक्ष ठेवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.