
शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहरातील बालाजी फैल परिसरातील प्रसिद्ध संत भगवान बाबा मंदिरात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, या मंदिरात गेल्या महिन्याभरात दोन ते तीन वेळा चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी मंदिरातील महादेवाच्या पिंडावरील जलधारा आणि समय चोरी करून नेल्याचे उघड झाले. या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंदिर परिसर असुरक्षित वाटत असून, श्रद्धाळू भाविकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.
या प्रकारामुळे मंदिर प्रशासनासह स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंता आहे. अनेकांनी या घटनांची गंभीर दखल घेण्याची आणि पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचण संत भगवान बाबा मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सुविधेमुळे चोरी झाल्याची नेमकी वेळ आणि दोषी व्यक्ती याबाबत माहिती मिळण्यात अडचण येत आहे. यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या घटनांकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर सुरक्षा यंत्रणा वाढवण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू या घटनेनंतर शेगाव पोलीस स्टेशनकडून तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील संशयितांची चौकशी केली जात आहे. लवकरच गुन्हेगारांना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.