---Advertisement---

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

---Advertisement---

१५ ऑगस्टला आंदोलनाची चेतावणी


चांगेफळ
 (आकाश बोरसे) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चांगेफळ निवाणा–सावळा–जामोद या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थी आणि गावकऱ्यांची रोजची ये-जा धोकादायक ठरत असून, अनेक विद्यार्थी सायकलवरून पडून जखमी झाले आहेत. अंगावर उडणाऱ्या चिखलामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत न जाता घरी परतावे लागते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षी २०२४ मध्ये चांगेफळ निवाणा ते सावळा ते जामोद या रस्त्याचे काम मंजूर झाले होते. यापैकी जामोद ते सावळा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी सावळा ते चांगेफळ निवाणा हा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. 

विशेषतः सावळा गावाजवळील सुमारे १ किमी आणि चांगेफळ खुर्द येथून मुख्य रस्त्यापर्यंतचा सुमारे १ किमी रस्ता हा अपूर्ण असून, बाजूला फक्त भराव टाकून काम थांबवण्यात आले आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात संतप्त ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव जामोद येथील पुंडकर यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना यांच्या वतीने विद्यार्थी व गावकऱ्यांना घेऊन साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दांडगे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत इंगळे (संग्रामपूर), युवा सेना शाखाप्रमुख अक्षय बगाडे, मोहन कांडेलकर, गणेश बगाडे, प्रमोद कंडारकर यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मते, रस्ता तातडीने पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि रुग्णांचे हाल आणखी वाढणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment