चांगेफळ (आकाश बोरसे) : श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यानिमित्ताने १० ऑगस्ट रोजी, श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी, जळगाव जामोद येथून त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, काकडवाडा येथे जाणाऱ्या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या पवित्र दिंडीचा यावर्षी १८वा वर्धापनदिन असून गेल्या १७ वर्षांपासून अखंडपणे चालू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली. कुलकर्णी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही वारी सुरुवातीस केवळ आठ वारकऱ्यांसह सुरू झाली होती, परंतु आज शंभरहून अधिक महिला वारकरी भक्तिभावाने सहभागी झाल्या आहेत.
या दिंडीसाठी संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे विशेष चहा-पाणी, फराळ आणि केळी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे यात्रेकरूंना विश्रांती व ऊर्जा मिळाली.
वारकरी “ॐ नमः शिवाय”, “राम कृष्ण हरी”, “विठ्ठल विठ्ठल पांडुरंग” या गजरात सुमारे ३० किलोमीटरची वारी मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने पूर्ण करत आहेत.
कुलकर्णी महाराज म्हणाले की, “ही केवळ परंपरा नाही, तर ही श्रद्धा आणि भक्तीची साखळी आहे, जी दरवर्षी अधिक बळकट होत आहे.” भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा पाहता, ही दिंडी भविष्यात अधिक व्यापक होईल यात शंका नाही. (युवा क्रांती वृतसेवा)