---Advertisement---

सरकारलाच दंगल घडवायची आहे – मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

---Advertisement---

जालना (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्षं लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे. जालना आंदोलन मुंबईत यावं आणि त्यातून दंगल व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. सरकार जाणूनबुजून मराठ्यांच्या अंगावर फेक करत आहे”, असा आरोप त्यांनी शनिवारी अंतरवली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

जरांगे पुढे म्हणाले, “आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की आम्ही शांततेतच येणार आहोत. आरक्षणही आम्ही शांततेतच घेणार आहोत. कोणीही आडवा आला तरी आम्ही मुंबईत जाणारच. आझाद मैदानावर उपोषण करण्याचा आमचा अधिकार आहे.”

ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा अंतरवलीत शांततेत आंदोलन बसलो होतो, तेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्यातच रक्तपात घडवला गेला. येवल्याच्या लोकांना हाताशी धरून भांडण लावण्यात आलं. मग आम्हाला सरकारवर संशय का येऊ नये? त्यांना पोलीस बघून घेतील याचा अर्थ काय? हा दंगल घडवण्याचा दुसरा प्रयत्न नाही तर काय आहे?”

दरम्यान, जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करताना जरांगे म्हणाले की, “जाळपोळ करणारे आमचे नाहीत. तेच लोक देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतील, दगडफेक करतील. असे लोक आमच्यात घुसवले जातील. त्यांना पोलिसांनी ताबडतोब पकडावे.” आगामी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “

२९ ऑगस्टला आमच्या आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आम्ही मुंबई न्यायासाठी येत आहोत. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे. आम्हाला पाणी दिलं पाहिजे. गणेशोत्सव आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. आम्ही उत्सवाचा आनंद घेऊ आणि आमचे गणपती बाप्पा देखील मुंबईतच आणणार आहोत. ग्रामीण महाराष्ट्र आणि मुंबईकर एकत्र येऊन जो सोहळा घडवतील, तो जगात कधीच पाहायला मिळणार नाही.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही मराठी हिंदू संस्कार पाळतो, वारकरी संप्रदायाचे पालन करतो. गणेशोत्सव हा आमच्या मुलांच्या सुखासाठी आहे, तर आरक्षण आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे. आमची चूक काय आहे? आम्ही तुमचीच लेकरं आहोत, गरीबांची लेकरं तुमच्या दाराशी येत आहेत. चार महिन्यांपूर्वी जेव्हा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा गणेशोत्सवाची तारीख माहित नव्हती.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment