जम्मू-काश्मीरला पावसाने झोडपले : राज्यभरातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला असून, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे .
जम्मू-काश्मीर (युवा क्रांती वृतसेवा) : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. सलग अनेक दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झाल्याने भीषण दुर्घटना घडली.
रियासी जिल्ह्यातील पर्वतीय भागात मंगळवारी झालेल्या या भूस्खलनात बुधवारी बचाव पथकांनी ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे मृतांची संख्या ४१ वर पोहोचली असून किमान २० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अजून काहीजण अडकले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, वैष्णोदेवी यात्रेला तातडीने स्थगिती देण्यात आली असून यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून काही भागांमध्ये संपर्क तुटला आहे.सध्या पूरपरिस्थिती आणि भूस्खलनामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन, सेना, एनडीआरएफ व पोलीस यांच्या संयुक्त पथकांकडून मदतकार्य अखंड सुरू आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ताज्या परिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मिळालेल्या तत्पर मदतीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
