राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना २२ कोटींच्या पारितोषिकांची गौरवमालिकाअजित पवारांच्या हस्ते पुरस्कार वितरण;
पुणे (युवा क्रांती वृतसेवा) : म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील एकूण ३३१ विजेत्या खेळाडूंना गौरवण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एकूण २२ कोटी ३१ लाख रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात आली.
“राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेली २२ कोटींची रोख बक्षिसे ही त्यांच्या कष्टाला दिलेली खरी दाद आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ आंतरराष्ट्रीय आणि ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमात ‘मिशन लक्ष्यवेध – हाय परफॉर्मन्स सेंटर’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी क्रीडा योजनेच्या लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेतून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, माजी क्रीडा प्रशासक नामदेव शिरगांवकर, प्रशिक्षक संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमातून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सकारात्मक दृष्टीकोनाची व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेची ठळक पावती मिळाली.
