बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४-२५ मधील प्रलंबित पीकविमा देण्याचा सकारात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिली.
एकूण ४ लाख ७२ हजार ५८४ शेतकऱ्यांना ६३५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर होती. मात्र AICC कंपनीने १६० ठिकाणचे पंचनामे अमान्य करून २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांचा विमा प्रलंबित ठेवला होता. जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय समित्यांनी कंपनीचे अपील फेटाळून शेतकऱ्यांना विमा देण्याचा निर्णय कायम ठेवला.
दि. १ ऑक्टोबर रोजी कृषी विभागाचे अवर मुख्य सचिव विकास रस्तोगी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कंपनीला शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचे आदेश देण्यात आले.
“हा दिलासादायक निर्णय असला तरी कंपनीने केंद्र सरकारकडे अपील केल्यास मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांचा हक्काचा विमा मिळावा यासाठी पुढील पाठपुरावा सुरूच राहील,” असे डॉ. कुटे यांनी सांगितले. (युवा क्रांती वृत्तसेवा)










