शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत आमदार कुटे यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करत पक्षाच्या विजयासाठी प्रभावी रणनिती स्पष्ट केली.
बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण होते. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश दिसून आला. आगामी निवडणुकीत शेगांव नगरपरिषदेत पक्षाच्या झेंड्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
बैठकीनंतर वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी जोम आणि आत्मविश्वास वाढलेला दिसून येतो आहे.










