शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 8 (अ) येथे तिरंगी लढतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे रमेश मोहोड, काँग्रेसचे शैलेंद्र पाटील आणि मनसे पुरस्कृत नगर विकास आघाडीचे सोपान भागेवार या तीनही उमेदवारांनी प्रभाग जिंकण्यासाठी जोमदार प्रचार सुरू केला आहे.
गल्लोगल्ली, घराघरांतील भेटी, सोशल मीडियावरील प्रचार आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क या सर्व माध्यमांतून तिन्ही पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आक्रमक प्रयत्न सुरू आहे. विकासकामांची वचने, स्थानिक प्रश्नांचे निराकरण आणि संघटनांची ताकद या आधारे तिन्ही उमेदवारांनी आपला प्रचार अधिक जोमदार केला आहे.
भाजपचे रमेश मोहोड संघटनाच्या बळावर विजयाचा दावा करत आहेत, तर काँग्रेसचे शैलेंद्र पाटील स्थानिक जनाधार आणि परंपरागत मतदारांवर भर देत आहेत. दुसरीकडे, मनसे पुरस्कृत नगर विकास आघाडीचे सोपान भागेवार तिसऱ्या पर्यायाच्या रूपात प्रभागात मजबूत पाय रोवण्याचा प्रयत्न करत असून युवा मतदारांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
या तिरंगी स्पर्धेमुळे प्रभाग 8 (अ) मधील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोण मारणार बाजी आणि प्रभागाचे प्रतिनिधित्व कोणाकडे जाणार… हे मतमोजणीच्या दिवशीच निश्चित होणार आहे. मतदारांच्या पसंतीचे वारे कुठे वाहत आहेत, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.












