शेगांव (डि ललित) : शेगांव शहरातील आकोट रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने स्कुटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात स्कुटीस्वार जखमी झाले असून स्कुटीचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते.
फिर्यादी संजय कडू नवलकार (वय 56 वर्षे, रा. एसबीआय कॉलनी, शेगांव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक (MH 05 BL 4542) च्या चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवत त्यांच्या स्कुटी वाहन क्रमांक (MH 30 BR 5254) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्या स्कुटीचे मोठे नुकसान झाले आहे.
तक्रारीवरून शेगांव शहर पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी म.पो.हे.का. गंवई यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपासाची जबाबदारी पो.हे.का. घट्टे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात आवश्यक ई-साक्ष नोंदविण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (युवा क्रांती वृत्तसेवा)













