---Advertisement---

“मी नक्की मेलघाटात येईन” : संसदेत आदिवासींशी संवाद साधत प्रियंका गांधींचे आश्वासन

संसद भवनात आदिवासींसोबत प्रियांका गांधी
---Advertisement---

नवी दिल्ली (आकाश बोरसे) : “आप कैसे हो? आपकी समस्या क्या है? आपको यहाँ आकर कैसा लगा?” अशा आपुलकीच्या शब्दांत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी यांनी मेलघाटातून दिल्ली येथे आलेल्या आदिवासी बांधवांशी संसद भवनात संवाद साधला. **खासदार बळवंत वानखडे यांच्या समवेत आलेल्या या आदिवासी प्रतिनिधींशी बोलताना प्रियांका गांधी यांनी “मी नक्की मेलघाटात येईन” असे स्पष्ट आश्वासन दिले.

ज्यांनी आजवर कधीही आपल्या गावची वेस ओलांडली नव्हती, अशा दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी देशाची संसद, संसद भवन परिसर आणि राष्ट्रीय पातळीवरील लोकशाहीची कार्यपद्धती जवळून पाहिली. नेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली. खासदार बळवंत वानखडे यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘संसद दर्शन’ हा उपक्रम साकार झाला.

मेलघाटातील गंभीर प्रश्न मांडले

खासदार प्रियांका गांधी व काँग्रेसचे संघटन सचिव खा. के. सी. वेणुगोपाल यांच्याशी खा. बळवंत वानखडे यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी आदिवासी बांधवांनी कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि नेटवर्क या मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. या सर्व मुद्द्यांची दखल घेत प्रियांका गांधी यांनी मेलघाटात प्रत्यक्ष येऊन परिस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले.

आजी-आई-मुलगी : गांधी कुटुंबाची मेलघाटाशी नाळ

मेलघाटाशी गांधी कुटुंबाचा जुना भावनिक संबंध आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी कोलकास येथे भेट दिली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांची सभा धारणी तालुक्यातील दुनी येथे झाली, तर राहुल गांधी यांनी मेलघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा शहरात सभा घेतली होती. या परंपरेत आता प्रियांका गांधी यांनी मेलघाटात येण्याचे दिलेले आश्वासन हे विशेष मानले जात आहे.

अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या दौऱ्यात माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात दयाराम काळे, सहदेव बेलकर, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, मेहपतसिंग उईके, संजय बेलकर, राजेश सेमलकर, पीयूष मालवीय, नानकराम ठाकरे, बलाराम जांम्बु, सोहन कासट, तुळसिराम दहीकर, गानु सावलकर, उमेश जांबे, ललित नैकले, कृष्णा राजणे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment