मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी बुधवारचा दिवस अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ठरला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे आता नेमकी कुणाकडे जाणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जागी पक्षाची जबाबदारी कोण सांभाळणार, यासाठी येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांची भूमिका केंद्रस्थानी
अजित पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांचे नाव पक्षाच्या नेतृत्वासाठी चर्चेत आहे. मात्र, त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्वीकारलेली नाही. राष्ट्रवादीतील अनेक नेते, आमदार आणि कार्यकर्ते सुप्रिया पवार यांनी नेतृत्व स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
दोन राष्ट्रवादी, एकच निर्णय?
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याची संधी निर्माण झाली आहे, अशी चर्चा आहे. पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
उपमुख्यमंत्रीपदाचा पेच
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, याबाबत लवकरच राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.











