---Advertisement---

शेगावमध्ये “मागेल त्याला गतिरोधक” योजनेवरून वाद; नागरिकांचे नगर परिषदेला उपरोधिक अभिनंदनपत्र

नगर परिषद शेगांव
---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : लोकमत मध्ये दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या “मागेल त्याला गतिरोधक” या बातमीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या गतिरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही जागरूक नागरिकांनी नगर परिषद, शेगाव यांच्या मुख्याधिकाऱ्यांना उपरोधिक अभिनंदनपत्र सादर केले आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते निलेश घोंगे यांच्यासह काही नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे नागरिकांची भूमिका?

  • नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नगरसेवक व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी “जागतिक दर्जाचा विकास” केल्याबद्दल उपरोधिक अभिनंदन केले आहे. त्यांच्या मते:
  • प्रमाणित तांत्रिक नियमांकडे दुर्लक्ष करून गतिरोधक उभारले जात आहेत.
  • ज्या ठिकाणी गरज नाही, तिथेही गतिरोधक बसवले जात असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे.
  • रस्ते सपाट ठेवण्याऐवजी “अडथळ्यांनी सुशोभित” करण्याची पद्धत अवलंबली जात आहे.
  • पत्रात “अडथळा निर्माण गौरव” पुरस्कार देण्याची मागणी करत शहराला “गतिरोधकांचे शहर” अशी नवी ओळख द्यावी, असा टोमणाही निलेश घोंगे यांनी मारला आहे.

वाहनचालक त्रस्त?

स्थानिक वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, अचानक उभारलेले आणि योग्य चिन्हांकन नसलेले गतिरोधक अपघातास कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः दुचाकीस्वार व आपत्कालीन सेवांना याचा फटका बसत असल्याची चर्चा आहे.

तांत्रिक नियमांचे पालन आवश्यक

वाहतूक तज्ञांच्या मते, गतिरोधक उभारणीसाठी भारतीय रस्ते काँग्रेस (IRC) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. योग्य उंची, रुंदी, रंगसंगती आणि सूचना फलक नसल्यास नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

प्रशासनाची प्रतिक्रिया अपेक्षित

या प्रकरणी नगर प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, शहरातील गतिरोधकांची तपासणी करून आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment