---Advertisement---

बुलढाणा जिल्हा परिषदेत जिजाऊ व बाल शिवबा शिल्पाचे अनावरण! ना. प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन

shivjayanti
---Advertisement---

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था असलेल्या बुलढाणा जिल्हा परिषद च्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांचे भव्य शिल्प अनावरण सोहळा गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, जिल्हा परिषद प्रवेशद्वारी उभारण्यात आलेले हे शिल्प विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रेरणादायी ठरेल. ग्रामस्वराज्यासोबत सुराज्याचा विश्वास दृढ करण्यासाठी महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, माजी सभापती दिलीप जाधव, जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंदर बुधवत, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. जाधव व आ. गायकवाड यांच्या हस्ते संगीतमय वातावरणात व आतषबाजीदरम्यान शिल्पाचे अनावरण करण्यात आले. युवा शाहीर विक्रांतसिंग राजपूत यांच्या शिवचरित्र कथनाने कार्यक्रमात उत्साहाची भर पडली. जिल्हा परिषद कर्मचारी व बोरखेडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

समारंभाचे प्रास्ताविक आशिष पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी व किरण वाघमारे यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment