🟣मुंबई|(आकाश बोडसे): महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने राज्यसभेच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील सात राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार असून विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे सहा उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असून त्या जागेसाठी शरद पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय
पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवार्दन सपकाळ यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष तसेच इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. देशाच्या राजकारणात मोठा अनुभव असलेल्या शरद पवार यांना राज्यसभेत पाठवण्याबाबत सर्वानुमते निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
या निर्णयाबद्दल बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, त्यांनी आणि जयंत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. जवळपास दोन तास सविस्तर चर्चा झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ्या मनाने शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे २० आमदार आहेत. त्यानंतर काँग्रेसचे १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आमदारांचा देखील महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.
राज्यसभा निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीची किमान ३७ मते आवश्यक असतात. महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ असल्यामुळे शरद पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
राज्यातील या निर्णयामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)








