नवी दिल्ली(आकाश बोरसे): इराण-इस्त्राइल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत. देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडर महागले आहेत.
१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात हे नवे दर ७ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम होणार असून महागाईचा आणखी एक झटका बसला आहे.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७२०.५० रुपयांवरून वाढून १८३५ रुपये झाली आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्री Hardeep Singh Puri यांनी या अफवांना फेटाळून लावले. तसेच Indian Oil Corporation कडूनही देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारच्या माहितीनुसार भारताकडे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून अमेरिकेसह इतर देशांकडूनही आयात सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)










