बुलडाणा (आकाश बोरसे): बूलडाणा जिल्ह्यातील राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तसेच वन बुलडाणा मिशनचे संकल्पक श्री. संदीप शेळके यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते अधिकृतपणे पक्षप्रवेश केला.
या प्रवेशामुळे बूलडाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून जिल्ह्यात सक्रिय असलेले संदीप शेळके यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला स्थानिक पातळीवर बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
या प्रसंगी एआयसीसीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे तसेच बूलडाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे उपस्थित होते.
नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्साहात संदीप शेळके यांचे स्वागत केले. आगामी काळात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.(युवा क्रांती वृत्तसेवा)









