ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याचा बुलढाणा येथे झाला गौरव!
पळशी झाशी (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांना ग्रामविकास, लोकहिताची कामे, स्वच्छता अभियान, जनसहभाग आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल प्रतिष्ठेचा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बुलढाणा येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात माननीय आमदार श्री. मनोजदादा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लोकमत समूहाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पळशी झाशी गावाला वेगळी ओळख निर्माण करून देण्यात सौ. प्रियंका मेटांगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकासकामे राबविण्यात आली असून स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक उपक्रम आणि शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“आज बुलढाणा येथे मला मिळालेला हा सन्मान माझा एकट्याचा नसून संपूर्ण पळशी झाशी गावाचा आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. आज गावाचे नाव सर्वत्र उज्ज्वल होत आहे, त्यामागे प्रत्येक ग्रामस्थाचा सिंहाचा वाटा आहे. हा पुरस्कार मी माझ्या सर्व गावकऱ्यांच्या चरणी अर्पण करते.”
या सन्मान सोहळ्यावेळी पळशी झाशी गावातील उपसरपंच पंचफुलाबाई पवार, ग्रामपंचायत सचिव हेमंत देशमुख, माजी सरपंच सौ. संगीताताई चितोडे, अभयसिंह मारोडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेशभाऊ हेलगे, उमेशभाऊ कोठे, पोलीस पाटील संतोष निकाळजे, माजी सैनिक मनोहरभाऊ दोरकर, गजाननभाऊ वाघ, रामभाऊ येनकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख विजयभाऊ मारोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ ठाकरे, रामदासभाऊ कुयटे, श्रीरामभाऊ बानाईत, हरिभाऊ मारोडे, पांडुरंग हागे, निळकंठ मारोडे, अमित मारोडे, बबलू मारोडे, अनिल शिरसोले, पप्पू शर्मा, संजय गिरी, श्रीधर चितोडे, मनीष करांगळे, सागर मारोडे, संदीप चितोडे, संतोष रणशिंगे, अतुल बांगर, सोहम मारोडे, जय मेटांगे, अमोल विजय ठाकरे, पवन फसाले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, रोजगार सहाय्यक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे पळशी झाशी गावाच्या विकासात्मक कार्याची राज्यभरात दखल घेतली गेली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा पुरस्कार गावाच्या प्रगतीच्या वाटचालीस नवी प्रेरणा देणारा ठरत आहे.
प्रतिक्रिया
“लोकमत सरपंच अवॉर्ड हा माझा वैयक्तिक सन्मान नसून पळशी झाशीच्या प्रत्येक ग्रामस्थाच्या विश्वास, सहकार्य आणि सहभागाचा गौरव आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत, उपसरपंच, सचिव, सदस्य, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असून भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करू. पळशी झाशी हे आदर्श, स्वच्छ आणि प्रगत गाव म्हणून राज्याच्या नकाशावर अधिक ठळकपणे उभे राहावे, यासाठी कटिबद्ध राहू.”
— सौ. प्रियंका राहुल मेटांगे, सरपंच, ग्रामपंचायत पळशी झाशी. (युवा क्रांती वृत्तसेवा)










