नाशिक(युवा क्रांती वृत्तसेवा): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे राजकारण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस (17 नोव्हेंबर 2025) पार झाल्यानंतर पक्षांमध्ये पर्द्यामागील हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अशात नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आहे.
उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा देत आज, मंगळवार (18 नोव्हेंबर) रोजी, मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांशी त्यांचे संपर्क सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या, त्यावर हिरे यांनी शिक्कामोर्तब केले.
हिरे यांच्यासोबत अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने नाशिक जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक राजकारणात या निर्णयाचे पडसाद उमटू लागले असून, हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषत: मालेगाव बाह्य मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पकड वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हिरे यांच्या प्रवेशाला महत्त्व मिळाले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांना चुरसपूर्ण लढत दिली होती, त्यामुळे त्यांच्या नव्या राजकीय भूमिकेमुळे स्थानिक राजकारण अधिकच रंगणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. हिरे यांच्या महायुती प्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकीत नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता आहे.









