अकोट (आकाश बोरसे) : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल (रा. मोहाळा, ता. अकोट) यांच्यावर दि. 06 जानेवारी 2026 रोजी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात उबेद खाँ कालु उर्फ राजिक खाँ पटेल (वय अंदाजे 22 वर्षे, रा. मोहाळा ता. अकोट) याने हल्ला केल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई
पोलीस अधीक्षक मा. अर्चित (अचिंत) चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
पोलीस निरीक्षक अमोल माळवे व त्यांच्या स्टाफने धांडे हॉस्पिटल येथे योग्य तो बंदोबस्त ठेवला. तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी तात्काळ ग्राम मोहाळा येथील घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले व तपासाअंतर्गत ई-साक्ष नोंदवण्यात आल्या.
सहा पथकांचा शोध; आरोपी ग्राम पणज येथून अटक
आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, अकोट ग्रामीण, अकोट शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची एकूण 6 पथके तयार करण्यात आली. सुमारे 40 अधिकारी व अंमलदारांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या दिशेने शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर ग्राम पणज, ता. अकोट येथून आरोपीस रात्री अंदाजे 08.00 वाजता ताब्यात घेण्यात आले. (युवा क्रांती वृत्तसेवा)









