शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा ):शहरात सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी अॅपे वाहन उभे करून वाहतूक व्यवस्था धोक्यात घालणाऱ्या एका युवकावर पोलीसांनी कारवाई करण्यात आली. सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजेदरम्यान ही घटना घडली.
टाउन परिसरात नियमित पेट्रोलिंगदरम्यान पोलीस पथकाला हॉटेल स्नेहाजंली रोडच्या समोरील सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी MH-28 T 1556 क्रमांकाचे अॅपे वाहन निर्बंध न पाळता उभे असल्याचे दिसून आले. संशयित चालक रस्त्याच्या मध्यभागी वाहन उभे करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत लोकांशी गप्पा मारताना आढळला.
या निष्काळजी कृतीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी तत्काळ कारवाई केली. संबंधित वाहनचालक हा शेगांव येथील दगदाळीपुरा परिसरातील २७ वर्षीय युवक असल्याचे समोर आले आहे.
घटनेची नोंद त्याच दिवशी रात्री सुमारे ८.५० वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. दाखल प्रक्रिया पोहेकॉ रामदास घटटे यांनी पूर्ण केली. पुढील तपासाची जबाबदारी सफौ. गजानन मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी अशा निष्काळजी वाहनधारकांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला आहे.













