पुणे (युवा क्रांती वृतसेवा) : अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यात आंदेकर-कोमकर गँगवॉरचा भडका उडाला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी वीस वर्षीय आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली. ही घटना पाच सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता नाना पेठेत घडली. आयुषच्या मृत्यूला तीन दिवस उलटल्यानंतरही त्याच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. याचे कारण आता समोर आले आहे.
मयत आयुष कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. तो वनराजचा सख्खा भाचाही होता. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याच्या नेतृत्वातील आंदेकर टोळीचं वर्षभर प्लॅनिंग सुरु होतं. पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी एक कट उधळूनही लावला होता. परंतु नाना पेठेत आयुषला गाठून आंदेकर टोळीने त्याचा काटा काढलाच.
दरम्यान, आयुषच्या हत्येला तीन दिवस झाले, तरी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्याचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
आयुषचे अंत्यविधी आज, सोमवार 8 सप्टेंबर रोजी केले जाणार आहेत.आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुण्यातील नाना पेठेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे तात्काळ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची संमती देण्यात आली नव्हती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा विसर्जन मिरवणुकांसाठी तैनात करण्यात आल्याने आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी संरक्षण पुरवणं शक्य नव्हतं, हे आयुषचे अंत्यसंस्कार लांबणीवर पडण्याचं एक कारण
दुसरीकडे, वनराजच्या हत्या प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर, काका जयंत कोमकर आणि काकी संजीवनी कोमकर हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आयुषवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी पॅरोलची मागणी केली होती. तिघांपैकी केवळ आयुषचे वडील गणेश कोमकर याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान, गणेश कोमकर सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला पुण्यात आणण्यासाठी वेळ लागत असल्यानं आयुषवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारातून दुपारी बाहेर काढला जाणार आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर कुटुंबासह 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून यात आयुषचे आजोबा बंडू आंदेकर यांचाही समावेश आहे.










