जळगांव (जा.)(आकाश बोरसे) : तालुक्यातील बोराळा बु. येथील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्येला अखेर तोडगा निघाला आहे. युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरणने नवीन 100 KVA डीपी (ट्रान्सफॉर्मर) बसवून दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्राम बोराळा बु.च्या शिवारात पूर्वी 63 KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता. मात्र परिसरातील वीजेचा वाढता लोड लक्षात घेता हा ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उत्पादनावरही परिणाम होत होता.
शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अखेर या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना याबाबत माहिती दिली.
यानंतर ९ मार्च २०२६ रोजी अक्षय पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जळगाव जामोद येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मिळताच त्यांनीही महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
सुमारे ३ तास चाललेल्या आंदोलनानंतर मलकापूर येथील कार्यकारी अभियंता मिश्रा यांनी नवीन 100 KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि काही वेळातच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला.
या आंदोलनात शेतकरी अशोक राखुंडे, क्रांतिकारी शहराध्यक्ष अजय गिरी, अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार, वैभव जाणे, आकाश आटोळे, अमोल बहादरे, त्रिलोकसिंह राजपूत, सागर वाघ, विजय रायपुरे, गणेश तायडे, सदाशिव जाणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)









