बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी इच्छुक नेते, कार्यकर्ते आणि पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे केवळ सत्तेचे प्रतीक नसून, जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे महत्त्वाचे नेतृत्व मानले जाते. त्यामुळे या पदासाठी होणारी लढत नेहमीच मोठ्या उत्सुकतेने पाहिली जाते.
जिल्हा परिषद स्थापनेपासून काँग्रेस पक्षाने बहुतेक काळ अध्यक्षपदावर वर्चस्व राखले आहे. १९६२ मध्ये मलकापूरचे बी. के. पाटील हे पहिले अध्यक्ष होते आणि त्यानंतर अनेक कार्यकाळ काँग्रेसने गाजवले. फक्त २०१७ मध्ये भाजपच्या उमाताई शिवचंद्र तायडे यांनी अध्यक्षपद भूषवले होते. घाटावरच्या भागातील नेत्यांचे वर्चस्व अधिक राहिले असून, घाटाखाली काँग्रेसकडून दादासाहेब बाहेकर, प्रकाश पाटील अवचार, वर्षा वनारे यांसारखे नेते अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
आता सर्वसाधारण अध्यक्षपद खुले झाल्याने काँग्रेस आपले वर्चस्व कायम राखणार का, की भाजप पुन्हा संधी मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षही आपापली गणिते जुळवत आहेत. ‘पुढचा नंबर कोणाचा?’ हा प्रश्न जिल्हाभर चर्चेचा विषय बनला असून, गाठीभेटी, बैठका आणि जाहीर प्रचाराची तयारी जोरात सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत क्षेत्रांवर या पदाचा थेट परिणाम होत असल्याने निवडणुकीची चुरस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार असून, कोण कोणाला मागे टाकतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(युवा क्रांती वृतसेवा)










