बुलढाणा (आकाश बोरसे) : दिनांक 21 सप्टेंबरच्या रात्री व 22 सप्टेंबरच्या सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी, सिदखेडराजा, सोनाशी आणि तुळजापूर या चार मंडळ क्षेत्रांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले तसेच पावसाचे पाणी अनेक घरांत शिरल्याने घरांचे व घरातील सामानांचे मोठे नुकसान झाले. शेतजमिनीही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाच्या नोंदीप्रमाणे, बुलढाणा तालुक्यातील पाडळी मंडळात 121.3 मिमी, देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर मंडळात 65.8 मिमी, सिदखेडराजा मंडळात 65.8 मिमी आणि सोनाशी मंडळात तब्बल 175.3 मिमी पाऊस झाला.
या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कृषी विभाग, महसूल विभाग आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
(युवा क्रांती वृतसेवा)










