सोनाळा (आकाश बोरसे) : शासनाने बंदी घातलेला आणि मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा चायनीज नायलॉन मांजा साठवून ठेवणाऱ्या दोन व्यक्तींवर सोनाळा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई 8 डिसेंबर रोजी पार पडली असून ठाणेदार सपोनि संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंगळी वेस शिवार, सोनाळा येथे नायलॉन मांजाची अवैध विक्री सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिस पथकाने पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकून गौरव गजानन ढगे (वय 23) आणि विक्रम महादेव ठाकरे (वय 25, दोन्ही रा. सोनाळा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुकानावर शोध घेतला असता मोनो KTC कंपनीचा चायनीज नायलॉन मांजा असे 30 गोलाकार रिल मिळून आले. जप्त केलेल्या मांजाची अंदाजित किंमत सुमारे 6 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घातक मांजामुळे मानवी जीवितासोबतच पक्षी व निरपराध प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शासनाने या मांजाच्या विक्री-वापरावर संपूर्ण बंदी घातली असूनही काही ठिकाणी अवैध विक्री सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सदर कारवाई ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विशाल गवई, पोकॉ विनोद शिंबरे आणि वाहनचालक इमरान शेख यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ रमेश खरात यांच्याकडे आहे.
या कारवाईमुळे गावातील अवैध मांजा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अशा अवैध धंद्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)









