हरियाणा (युवा क्रांती वृतसेवा) : हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून, माजी क्रिकेट प्रशिक्षक रामकरण यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना ते आपल्या पत्नी आणि सुनेसोबत विवाह सोहळ्याला जात असताना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गाडी अडवून रामकरण यांच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत रामकरण यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या निवडणुकीतील राजकीय वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.










