बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारू बाळगून चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत देशी दारूची चोरटी वाहतूक उघडकीस आणली आहे.
दि. 14 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम चारचाकी वाहनातून देशी दारूचे बॉक्स घेवून अमडापूर येथून ग्राम मंगरुळ नवघरे चौफुल्लीकडे विक्रीसाठी येत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगरुळ नवघरे चौफुल्ली येथे नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता आरोपी सुरेश जगन्नाथ सवडतकर (वय 42, रा. अमडापूर, ता. चिखली) व शुभम विजय भालेराव (वय 25, रा. अमडापूर) हे देशी दारूची चोरटी वाहतूक करताना आढळून आले.
आरोपींच्या ताब्यातून
- देशी दारूचे 28 बॉक्स – किंमत ₹1,08,640/-
- मारुती सुझुकी एस-प्रेसो (पांढऱ्या रंगाची) – किंमत ₹3,00,000/-
असा एकूण ₹4,08,640/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन अमडापूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमडापूर पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगांव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोउपनि. अविनाश जायभाये, पोना अनंता फरताळे, सुनिल मिसाळ, पोकॉ. अमोल शेजोळ, गणेश वाघ, सतीश नाटेकर, मपोकॉ. पूजा जाधव आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (युवा क्रांती वृत्तसेवा)










