शेगांव (युवा क्रांती वृतसेवा): शेगांव येथील विश्राम भवनमध्ये काल, १४ सप्टेंबर रोजी, धनगर समाज महासंघाची जिल्हा बैठक माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सन २०२५ हे अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे वर्ष असल्याने त्यांच्या कार्याचा देशभर गौरव करण्यात आला होता. अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा स्मरणार्थ सरकारने संपूर्ण देशात त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. याच उपक्रमाला पुढे नेत धनगर समाज महासंघाने जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि शासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३०० महिलांना “अहिल्यादेवी रत्न” हा पुरस्कार देण्याची घोषणा केली.
या कार्यक्रमाला विभागीय अध्यक्ष अशोक देवकते, जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जूमळे, जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे, शेगाव शहराध्यक्ष सुरेश फासे, शेगाव तालुकाध्यक्ष अंबादास भिवटे, मल्हार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे यांसह प्रल्हाद पातोंड, योगेश बाजोड, नंदू पुंडे, दिलीप डांगे, गजानन गुरव, शिवाजी गुरव, रवींद्र महाराज गुरव, कडू पातुरडे, संतोष भारसाकळे, श्रीकांत कळंबे, चंद्रभान कळंबे, गोपाल बोरसे, पवन बरिंगे, अनंत वाघ आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सामाजिक एकजूट वाढवणे, शिक्षण आणि महिलांचा सहभाग यावर भर देण्यात आला. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन युवक-युवतींना प्रेरणा देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची योजना मांडण्यात आली.
श्रीराम पुंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली. पुढील काळात जिल्हाभर हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीमुळे समाजात नवे नेतृत्व घडवण्याचा व महिलांचे नेतृत्व सक्षम करण्याचा नवा संदेश देण्यात आला. समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.










