शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : संत नगरी शेगाव येथील प्रख्यात संत साहित्य अभ्यासक ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा प्रतिष्ठित ‘आध्यात्मिक वाड्मय पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला असून, या सन्मानामुळे शेगाव शहरासह साहित्यप्रेमी व संत परंपरेशी निगडित वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. मिरगे यांनी संत वाङ्मय, तत्त्वज्ञान आणि मराठी भक्तिसाहित्यातील मौलिक संशोधनाच्या माध्यमातून संत परंपरेचा गाढ अभ्यास सादर केला आहे. त्यांच्या लेखनातून संत विचारधारेचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ अत्यंत प्रभावीपणे उलगडला आहे. या योगदानाची दखल घेत मुंबई मराठी साहित्य संघाने त्यांना ‘आध्यात्मिक वाड्मय पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय घेतला.
या गौरवाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी एक कौटुंबिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मथुरा लॉन्सचे संचालक विनायकराव भारंबे तसेच हास्य सम्राट कवी नितीन वरणकार यांनी भेट देऊन डॉ. मिरगे यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. राजेश मिरगे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. मिरगे यांच्या कार्याचे आणि संशोधनाचे कौतुक करत, शेगाव या संतभूमीतून संतवाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान होणे हे अभिमानाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या यशाबद्दल शेगाव व परिसरातील साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक आणि सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी डॉ. मिरगे यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.










