शेगांव : (युवा क्रांती वृत्तसेवा) : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एफ. एम. काशेलानी स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात सकाळपासूनच आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या स्मृतीला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी मिकी माऊसचे आकर्षक कॉस्च्युम परिधान करून चिमुकल्या मुलांचे मनोरंजन केले. शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बालदिन का साजरा केला जातो, पंडित नेहरूंचे बालप्रेम आणि देशाच्या घडणीतले त्यांचे योगदान याबद्दल शिक्षकांनी सोप्या भाषेत मुलांना माहिती दिली. याचसोबत क्रांतिकारकांचे गुरू म्हणून ओळखले जाणारे लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या कार्याची व स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शाळेचे संचालक कुणाल काशेलानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्साही कार्यक्रम पार पडला. यावेळी सहसंचालक शुभम देशमुख, सहसंचालक भूमिका काशेलानी तसेच मुख्याध्यापिका योगिता गावंडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वर्गांची आकर्षक सजावट केली तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करून दिवस संस्मरणीय बनवला.













