---Advertisement---

सरकारचा ऐतिहासिक निर्णय! स्वातंत्र्य सेनानींचे ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्रात

---Advertisement---

इंडिया हाऊसचे स्मारक म्हणून जतन होणार; महाराष्ट्र सरकार करणार ऐतिहासिक इमारतीची खरेदी!

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लंडनमध्ये देशभक्तांचे केंद्रस्थान ठरलेल्या इंडिया हाऊस या ऐतिहासिक इमारतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. या इमारतीची खरेदी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार असून, ती स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीस्थळाच्या रूपात विकसित केली जाणार आहे.

लंडन दौऱ्यावर असताना ॲड. शेलार यांनी नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या हस्तांतरणासाठी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी इंडिया हाऊसला भेट देऊन तेथील भारतीय समुदायाशी चर्चा केली. त्या वेळी स्थानिक भारतीयांनी या इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत तिचे जतन करण्याची विनंती केली होती.

या पार्श्वभूमीवर परतल्यानंतर शेलार यांनी मुंबईत सांस्कृतिक कार्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली. या बैठकीत इमारतीच्या खरेदीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली.

इंडिया हाऊसचे ऐतिहासिक महत्त्व :
इंडिया हाऊस हे स्वातंत्र्यपूर्व काळात वीर सावरकर, मादाम भिखाजी कामा, श्यामजी कृष्ण वर्मा यांसारख्या महान क्रांतीकारकांचे केंद्र होते. ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे हे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील परदेशातील या ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन होऊन भावी पिढ्यांना त्या काळाची प्रेरणा मिळणार आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment