---Advertisement---

कवठळजवळील दुचाकी अपघाताचा धक्कादायक उलगडा; पत्नीच्या हत्येसाठी पतीनेच दिली सुपारी!!

---Advertisement---

बुलढाणा(आकाश बोरसे) : कवठळ गावाजवळ झालेला दुचाकी अपघात हा प्रत्यक्षात नियोजित खून असल्याचे उघड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येसाठी स्वतः पतीनेच सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

२ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास वृषाली प्रकाश गावंडे या दुचाकीवरून जात असताना कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ (एमएच २८ बीबी ५७५३) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजले होते.

मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून हा अपघात नसून नियोजनपूर्वक घडवून आणलेला खून असल्याचे स्पष्ट झाले. जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान संशयित वाहनाचा माग काढत पोलिसांनी मनीष नारायणसिंग सुर्यवंशी (रा. जगदंबा नगर, शेगांव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वृषाली गावंडे यांच्या हत्येची सुपारी घेतल्याची कबुली दिली.

पोलिस तपासात पुढे असेही उघड झाले की, या कटामागे मृत महिलेचे पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्यांचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) हे मुख्य सूत्रधार आहेत. वृषाली गावंडे यांचा जीव घेण्यासाठी आरोपींनी यापूर्वी तीन वेळा अन्नातून विष देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्याने अखेर अपघाताचा बनाव रचून वाहनाने धडक देत हत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कामासाठी मनीष सुर्यवंशी याला एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी वाहन चालक मनीष नारायणसिंग सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ६१(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment