शहरात ओपन जिम व जॉगिंग पार्क उभारणार
खामगांव (युवा क्रांती वृतसेवा) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खामगांव शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर यांच्या पुढाकारातून खामगांव शहरात लवकरच ओपन जिम व आकर्षक जॉगिंग पार्क उभारले जाणार आहेत.

नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे प्रोत्साहित करण्यासाठी व शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमासाठी शासकीय निधीबरोबरच खाजगी संस्थांचाही सक्रिय सहभाग राहणार आहे.शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, विविध लेआउटमधील मोकळ्या जागांमध्ये हिरवळ व जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. या सुविधांची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी इच्छुक संस्था किंवा संघटनांकडे सोपवली जाणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हाती घेतलेला हा उपक्रम खामगावकरांसाठी आरोग्यदायी भेट ठरणार आहे.
