नवी मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन श्रीकृष्ण काळे यांनी “खोट्या मतदारांचे प्रदर्शन!” या नावाने एक विशेष आणि वेगळ्या स्वरुपाचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये मतदार यादीतील अनियमितता, बनावट नावे, तसेच निवडणूक प्रक्रियेत होत असलेले संभाव्य गैरप्रकार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. नागरिकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन नवी मुंबईतील जनतेकडून चांगले प्रतिसाद मिळवत आहे.

उद्घाटनानंतर अमित ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “मतदान प्रक्रिया ही लोकशाहीची पायाभरणी आहे. तिच्यातील फसवणूक ही लोकशाहीसाठी धोका आहे. अशा अनियमिततेविरुद्ध प्रत्येक जागरूक नागरिकाने आवाज उठवणे गरजेचे आहे.”
मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की, या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे मतदार यादीतील खोट्या नोंदींबाबत जनतेत जागरूकता निर्माण करणे आणि प्रशासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधणे हा आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रदर्शन काही दिवस सर्वांसाठी खुले राहणार असून, नागरिकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











