---Advertisement---

लंडनमध्ये उभारणार मराठींसाठी ‘महाराष्ट्र भवन’

---Advertisement---

मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : लंडनमधील मराठी बांधवांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला स्वतःचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपयांचा धनादेश मंजूर केला असून तो ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील सर्वात जुनी मराठी संस्था आहे. तिची स्थापना १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांच्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून ही संस्था भाडेतत्त्वावर कार्यरत होती. अनेक पिढ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आता या संस्थेला स्वतःचे कायमस्वरूपी भवन मिळणार आहे.

‘महाराष्ट्र भवन’ हे केवळ सांस्कृतिक भवन नसून लंडन व युनायटेड किंगडममध्ये राहणाऱ्या मराठी समाजासाठी अभिमानाचे व आत्मीयतेचे ठिकाण ठरणार आहे. या माध्यमातून मराठी बांधवांना एकत्र आणून भाषा, संस्कृती, परंपरा आणि कला जपण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, संगीत व सामाजिक उपक्रमांसाठी या भवनाचा वापर होणार आहे.

यासोबतच महाराष्ट्र व युनायटेड किंगडम यांच्यातील सांस्कृतिक व सामाजिक संबंध अधिक दृढ करण्याचे कार्यही हे भवन करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीमुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्राची ओळख जगभरात ठळक करण्यास हातभार लागणार आहे.मराठी बांधवांची अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण झाल्याने लंडनमधील मराठी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. ‘महाराष्ट्र भवन’ हे भविष्यातील पिढ्यांसाठीही एक जिवंत स्मारक ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment