३३ हजारांहून अधिक रोजगारांची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक निर्णय !
मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्रात आज श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर औद्योगिक क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एकूण १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारांमुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा विविध विभागांमध्ये उद्योगांची उभारणी होणार असून, यामुळे ३३,४८३ नव्या रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.या सामंजस्य करारांची एकूण गुंतवणूक ₹३३,७६८.८९ कोटी इतकी असून, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण तसेच विविध संबंधित क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्र सरकार हे फक्त MoU वर स्वाक्षऱ्या करणारे नाही, तर त्या गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदारांच्या सोबत असणारे सरकार आहे.“ते पुढे म्हणाले, “गुंतवणूकदारांना राज्यात सहज, सुलभ आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. उद्योगांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी आम्ही प्रशासनिक पातळीवर आवश्यक त्या सर्व सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देऊ.“

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील महाराष्ट्रातील औद्योगिक धोरणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “हे केवळ सामंजस्य करार नसून, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचे पाऊल आहे.“ही सर्व गुंतवणूक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागली जाणार असून, स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
गुंतवणुकीच्या या नव्या लाटेमुळे महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी म्हणून ओळख आणखी मजबूत होणार असून, देशातील इतर राज्यांसमोर एक उदाहरण ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
