मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्रात अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध विकासकामे व महत्वाकांक्षी योजनांची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ सेंटर असून थेट परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे अशा जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राज्य विकासाच्या महामार्गावर वेगाने वाटचाल करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, गृहनिर्माण आणि पर्यटन या क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केली आहे. मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती, तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी गावातील शाळेच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले.
भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नविन सोना यांच्यासह भारतीय विदेश सेवेतील अधिकारी आणि यशदाचे उपमहासंचालक त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते











