नागपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी आणि SGB ऑफिसर्स पब्लिक स्कूलला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
महाराष्ट्रातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच IAS–IPS अधिकारी घडवणारी ही अग्रगण्य संस्था प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे लष्करी पद्धतीने स्वागत — डॉ. कुटे भावविवश
अकॅडमीमध्ये पोहोचताच विद्यार्थी आणि शिक्षकांनी लष्करी शिस्तीत केलेले स्वागत, तसेच ऑफिसर्स पब्लिक स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मनमोहक स्वागतगीत पाहून डॉ. कुटे भावनिक झाले.
संस्थापक प्रा. नरेंद्र पालांदुरकर, प्राचार्या वंदना लुटे यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.

“आपणच भारताच्या उज्ज्वल भविष्यातील अधिकारी”— आ. डॉ. कुटे
विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी सांगितले :
“आपणच भारताच्या उज्ज्वल भविष्यातील अधिकारी आणि जबाबदार नागरिक आहात. 2047 पर्यंत भारत जागतिक महासत्ता बनत असून, त्या राष्ट्राचे सक्षम घटक म्हणून आपण तयार होत आहात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
अकॅडमीतील उत्कृष्ट सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि प्रशिक्षणाच्या दूरदृष्टीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

जळगाव जामोद परिसरातही डिफेन्स ट्रेनिंग संस्था उभारण्याचा संकल्प
या भेटीदरम्यान त्यांनी जळगाव जामोद मतदारसंघातील सातपुड्याच्या पायथ्याशी अशाच दर्जाची डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमी उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.
निरोप घेताना ते म्हणाले—
“देशसेवेसाठी सज्ज होत असलेल्या या तरुण पिढीकडून सकारात्मक ऊर्जा घेऊन परतलो.”












