मुंबई, मंत्रालय (युवा क्रांती वृतसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथून हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा (विस्तारित) हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ (ऑनलाईन) केला.
राज्य शासन गतिमान दळणवळणाच्या सुविधा उभारण्यावर भर देत आहे. नांदेड ते मुंबई असा 610 कि.मी. चा प्रवास आता फक्त 9 तास 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पूर्वी जालना ते मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार असून, यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचे नवे द्वार उघडले असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे प्रगत देशांसारखी आधुनिक व वेगवान रेल्वे प्रणाली निर्माण करत आहे. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस अधिक सोयीस्कर आणि आकर्षक आहे. यात डब्यांची संख्या 8 वरून 20 करण्यात आली असून प्रवासी क्षमता 500 वरून 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
नांदेड हे शीख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना, तसेच नियमित प्रवास करणारे प्रवासी, अधिकारी आणि व्यापारी यांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांदरम्यान आरामदायी वातानुकूलित प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊन प्रवास आणखी वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यानिमित्त नांदेडकरांसोबतच मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदन करत महाराष्ट्राच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. यासोबतच सर्व प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
