---Advertisement---

मुंबईला गणेश विसर्जन सोहळ्याचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

---Advertisement---

मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) – महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर यावर्षीचा विसर्जन सोहळा अधिकच भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. गिरगाव चौपाटीवर पार पडलेल्या विसर्जन सोहळ्यात ढोल-ताशांच्या गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहाने भरलेले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम यांच्यासह मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी श्री गणरायाला पुष्पवृष्टी करत निरोप दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी संयम, शिस्त आणि भक्तीभाव यांचा उत्तम संगम साधून हा उत्सव साजरा केला. दहा दिवसांच्या उत्सवात जनतेत सामूहिक आनंद, श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडले.” त्यांनी विसर्जनप्रसंगी बाप्पाच्या जाण्याचे दुःख तर व्यक्त केलेच, पण पुढील वर्षी बाप्पा परत येतील याचा आनंदही शेवटी शेवटी मनात असल्याचे सांगितले.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह राज्यभरात विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. पोलीस दल, महापालिका आणि स्थानिक प्रशासन यांच्या सुयोग्य नियोजनामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. “या सर्व यंत्रणांनी केलेले काम कौतुकास्पद असून, त्यांच्या योगदानामुळे उत्सव सुरळीत पार पडला,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.

या सोहळ्यास हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा, लेझीम पथकं, महिला-पुरुषांचा सहभाग आणि मंडळांच्या आकर्षक देखाव्यांनी विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. संपूर्ण मुंबईत भक्ती, शिस्त आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा सुंदर संगम दिसून आला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment