बिहार (युवा क्रांती वृत्तसेवा): २०२५ बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रारंभीच्या मतमोजणीच्या कलांनी राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवण्याची शक्यता निर्माण केली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार एनडीए अनेक मतदारसंघांमध्ये भारी मतांनी पुढे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पहाटेपासून सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच एनडीएने आघाडी घेतली असून ग्रामीण तसेच शहरी भागातून मिळणाऱ्या मतांची सातत्यपूर्ण वाढ पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहे. अनेक मतदारसंघात एनडीए उमेदवारांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगली आघाडी मिळत असून काही ठिकाणी ही आघाडी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.
दरम्यान, मतमोजणी सुरू असल्याने अंतिम निकालासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असली तरी, प्रारंभिक कलांवरून सत्तांतराची चिन्हे दिसू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यभरातील मतदारांनी बदलाच्या दिशेने मतदान केल्याचे विश्लेषकांचे प्राथमिक मत आहे.
सुरक्षा व्यवस्था कडक ठेवत मतमोजणी सुरळीत पार पडत असून सर्व निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काही तासांत बिहारच्या राजकीय भवितव्याचा निर्णायक अध्याय समोर येणार आहे.








