स्व. पद्माकर माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) – सर्वांना आपलेसे वाटणारे, समाजासाठी नेहमी झटणारे, मोदीनगरचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व स्व. पद्माकर प्रल्हाद माळी यांचे अचानक निधन झाले असून या घटनेने मोदीनगरवासीयांवर शोककळा पसरली आहे.
“जो आवडी सर्वांना, तोच आवडी देवाला” या उक्तीप्रमाणे स्व. पद्माकर माळी यांनी आयुष्यभर समाजासाठी कार्य केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून न निघणारी आहे. ते लहानपणापासून स्वयंसेवक होते तसेच भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपले योगदान दिले.
मोदीनगरमधील प्रत्येक आनंदात आणि दुःखात त्यांची उपस्थिती नेहमी जाणवत असे. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रम असो, त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. समाजातील प्रत्येक घटकात ते सहभागी राहिले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे, मदतीस तत्परतेमुळे आणि सामाजिक कार्यातील सक्रियतेमुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले.
आज पहाटे त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच संपूर्ण मोदीनगरमध्ये शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, तर मनात त्यांच्या आठवणींचे झरे उसळले. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण समाजाचे एक आधारस्तंभ हरपले आहेत.
स्व. पद्माकरभाऊ माळी यांच्या कार्याला आणि विचारांना पुढे नेणे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श ठेवून समाजासाठी योगदान देणे हीच त्यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल.
संत गजानन महाराज त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगात धैर्य लाभो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.










